मन एव मनुष्याणाम्
डॉ. श्री बालाजी तांबेमन मनास उमगत नाही, हे खरंच. मन हे इंद्रिय अन्य इंद्रियांसारखं एखाद्या अवयवाला चिकटून येत नाही, त्यामुळे ते कुठंय ते सांगता येत नाही; पण ते असं इंद्रिय आहे, की जे सर्व शरीराला व्यापून असतं. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आणि अन्य इंद्रियांची कार्ये मनाच्या सहभागाशिवाय होत नाहीत. मन प्रसन्न असेल तर सारं जग सुंदर असतं. मनाची अप्रसन्नता सारं जगणं दुर्मुखलेलं करतं.
हा शरीर व आत्मा यांच्यामधला एक महत्त्वाचा दुवा असतो. इंद्रियांची कार्येसुद्धा मनाशिवाय होत नसतात. मन हे स्वतःसुद्धा एक इंद्रियच आहे. मन हे असं इंद्रिय आहे की जे सर्व शरीराला व्यापून असतं, शरीरातील सर्व लहान-मोठ्या घडामोडींना सहायक स्वरूप असतं.
कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होण्यासाठी आत्म्याची प्रेरणा जशी हवी, तसाच मनाचा सहभागही अत्यावश्यक आहे. कानाने आवाज तेव्हाच ऐकू येतो जेव्हा मन श्रोत्रेंद्रियाशी संबंधित असते. आपण प्रत्यक्षातही हा अनुभव कैक वेळा घेतो, की वाचनात दंग असताना एखादी व्यक्ती शेजारी येऊन उभी राहिली तर कळत नाही, पण टीव्हीवर आवडता कार्यक्रम पाहात असताना आईला मुलाने मारलेली हाक ऐकू येते. म्हणजेच मन ज्या इंद्रियाशी संबंधित असते त्याच विषयाचे ज्ञान होते, बाकीचे विषय ज्ञात होऊ शकत नाहीत.
मन मोलाचं
मन फार महत्त्वाचं आहे. कारण मन हे अहंकार, बुद्धी व इंद्रियांवरही आपला अधिकार गाजवू शकते.
मनाची कार्ये सांगताना चरकाचार्य म्हणतात -
इन्द्रियाभिग्रहः कर्म मनसः स्वस्यनिग्रहः । उहो विचारश्च ततः परः बुद्धिः प्रवर्तते ।।...चरक शारीरस्थान
इंद्रियांचे नियंत्रण करणे हे काम मनाचे आहे. "उह' म्हणजे ऊहापोह अर्थात अमुक गोष्ट केल्यास काय होईल व त्याचा परिणाम बरा-वाईट असा होईल व लाभ किंवा हानिकारक काय हे ठरविते ती बुद्धी. बुद्धीने बरे-वाईट काही सांगितले तरी इंद्रियांच्या कर्माची जबाबदारी मनाचीच असते. इंद्रिये स्वतःच्या विषयाकडे आकर्षित झाली की त्यावर मनाचा ताबा राहात नाही म्हणून इंद्रियविजय व मनःशक्ती वाढविणे हे उपाय महत्त्वाचे ठरतात.
एकदा मन नियंत्रणाखाली आले की शरीर-मानस व्यापार सुरळीत चालतात. म्हणूनच आयुर्वेदशास्त्रच नाही तर बाकी योगशास्त्र, अध्यात्मशास्त्रही "मनावर ताबा ठेवणे' ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट मानतात व त्या दृष्टीने उपायही सांगतात.
मन सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनी युक्त असते. खरं तर यातील सत्त्व हा "गुण' असून रज व तम हे "दोष'च समजले जातात. सत्त्वगुणाचे प्राधान्य असणारे मन शुद्ध, प्रसन्न व संशयरहित असते आणि अशा मनाचे स्वतःवरही पूर्ण नियंत्रण असते. मन हे अन्नमय आहे हे सर्वच प्राचीन भारतीय शास्त्रांनी आणि आधुनिक विज्ञानानेही मान्य केले आहे. आपण जे खाऊ तसं आपलं मन घडत जातं म्हणूनच आयुर्वेदशास्त्रात सात्त्विक आहाराची प्रशंसा केली आहे. मन हे उभयेंद्रिय असल्यामुळे त्यावर जडाच्या दिशेनं अन्नाचा व चैतन्याच्या दिशेनं आत्म्याच्या सात्त्विकतेचा परिणाम होत असतो.
No comments:
Post a Comment